नगर पंचायतीवर माहिती अधिकाराच्या पायमल्लीचा आरोप,अर्जदाराची अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
गडचिरोली:अहेरी नगर पंचायतीमध्ये माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली होत असल्याचा गंभीर आरोप एका अर्जदाराने केला आहे. वारंवार अर्ज करूनही माहिती दिली जात नसल्याने अर्जदार सुदामा हलदार( माहिती अधिकार महासंघ सह प्रचारक अहेरी तालुका) यांनी थेट अपर जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्याकडे तक्रार केली असून, संबंधित जन माहिती अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही केले आहेत.सुदामा हलदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी नगरपंचायतीच्या कामकाजासंबंधी माहिती मिळवण्यासाठी ०१/०१/२०२५, २३/०६/२०२५, २९/०७/२०२५, ०४/०८/२०२५, आणि १८/०८/२०२५ या विविध तारखांना अर्ज दाखल केले होते. मात्र, अहेरी नगर पंचायतीचे जन माहिती अधिकारी व प्रशासकीय अधिकारी वैभव पांढरे यांनी जाणीवपूर्वक कोणतीही माहिती उपलब्ध करून दिली नाही,असा आरोप सुदामा हलदार( माहिती अधिकार महासंघ सह प्रचारक अहेरी तालुका) यांनी केला आहे.या माहिती अधिकाराच्या अर्जांना उत्तर देण्याऐवजी,वैभव पांढरे यांनी स्वतःच्या बदलीसाठी अर्ज दाखल केला आहे. हा बदली अर्ज केवळ आपली जबाबदारी टाळण्यासाठी आणि नगरपंचायतीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालण्यासाठी केला असल्याचा दावा अर्जदार सुदामा हलदार ( माहिती अधिकार महासंघ सह प्रचारक अहेरी तालुका) यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.त्यामुळे, कायद्यानुसार हा बदली अर्ज तात्काळ नाकारण्यात यावा,अशी मागणीही त्यांनी केली आहे.या गंभीर प्रकरणात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सोनल वाकुलकर आणि सुदामा हलदार यांनी अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत.ज्यात जन माहिती अधिकाऱ्याचा बदली अर्ज तात्काळ नामंजूर करण्यात यावा.दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जांवर तातडीने कारवाई करून सर्व माहिती उपलब्ध करून द्यावी.माहिती लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जन माहिती अधिकाऱ्यावर उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करण्यात यावी. असा उल्लेख केला.या तक्रारीमुळे, अहेरी नगर पंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता अपर जिल्हाधिकारी यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.