रेल्वेच्या शौचालयात आढळला प्रवासी गळफास घेऊन मृत अवस्थेत
 
                                    
                                प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
बल्लारपूर : रेल्वेच्या शौचालयात प्रवाशी गळफास घेऊन मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना उघडकीस आली. आज ३० ऑगस्ट रोजी दुपारी रेल्वे स्थानक बल्लारपूर येथे खळबाजनक घटना उघडकीस आली. मुंबईहून येणारी नंदीग्राम एक्स्प्रेस क्रं ११००१ ही गाडी दुपारी सुमारे १.२० वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ०५ वर पोहचली होती. त्यात शौचालयात प्रवाशी गळफास घेऊन मृत अवस्थेत आढळून आला.या गाडीची सी अँड डब्ल्यू विभागाने नेहमीप्रमाणे अंतर्गत तपासणी सुरू केली असता, कोच क्रमांक एस ३ मधील उजव्या बाजूच्या शौचालयाचे दार आतून बंद असल्याचे आढळले. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र दार न उघडल्याने ही माहिती तत्काळ स्टेशन प्रबंधक बल्लारपूर यांना देण्यात आली.तसेच सदर माहिती जीआरपी बल्लारपूर यांना देण्यात आली. जीआरपीचे पोहवा अरविंद शाह व त्यांचा पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शौचालयाचे दार तोडले असता आतमध्ये एका व्यक्तीने कपड्याच्या साहाय्याने पाण्याच्या टाकीच्या पाइपाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळले.सदर व्यक्तीस खाली उतरवून रेल्वे डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत व्यक्तीकडे कोणताही ओळखपत्र सापडले नसल्याने त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. जीआरपीकडून पुढील तपासासाठी मृतदेह शासकीय रुग्णालय बल्लारपूर येथे हलविण्यात आला आहे. रेल्वे स्थानकावर घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांत काही काळ भीती व खळबळ उडाली होती.
 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
                     
                                                                 
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                            