मुलीने आईवर फेकले उकळते पाणी,आई गंभीर जखमी

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर: शिवनगर वार्ड, कादरिया मशीदजवळील परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. मुलीने स्वतःच्या आईवर उकळते पाणी फेकून गंभीर दुखापत केल्याची घटना शुक्रवारी १९ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. यात आई भाजून जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गीता लालचंद जयस्वाल (५०) या शिवनगर वार्डात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांच्या मुलीचे नाव सोनी दिनेश जयस्वाल (३४), मूळ राहणार मुगलसराय, चंदौली, उत्तरप्रदेश, सध्या मुक्काम बल्लारपूर असे आहे. कौटुंबिक मतभेदांमुळे मागील दोन वर्षांपासून सोनी आईसोबत बल्लारपूर येथे राहत होती.
१९ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास किरकोळ वादातून सोनीने घरातील अंगणात आंघोळीसाठी ठेवलेले उकळते पाणी प्लास्टिकच्या बादलीत भरून आईवर फेकले. या हल्ल्यात गीता यांच्या छाती, खांदा व पाठीवर गरम पाणी पडून त्या भाजून जखमी झाल्या. घटनेनंतर शेजाऱ्यांनी मदत करून जखमींना तातडीने बल्लारपूर येथील सरकारी दवाखान्यात नेले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
या प्रकरणी पोलिसांनी मुलगी सोनी दिनेश जयस्वाल हिच्याविरुद्ध भादंवि कलम ११८(१), ३५२ बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करत आहेत.