डायल 112 वर खोटी माहिती देणाऱ्या कोपरा गावातील इसमावर दहेगाव गोसावी पोलीसांनी गुन्हा दाखल

नावेद पठाण मुख्य संपादक
वर्धा : दहेगाव गोसावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोपरा (चाणकी) गावातील एका इसमाने डायल 112 वर खोटी माहिती दिल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11.42 वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन दहेगाव गोसावीच्या 112 एमडीटी मशीनवर मोबाईल क्रमांक 9021671789 वरून कॉल आला होता की, कोपरा गाव बसस्टॉप परिसरात 4 ते 5 जण जुगार खेळत आहेत. या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परंतु बसस्टॉप व परिसरात कोणीही जुगार खेळताना आढळले नाही, तसेच कोणतेही जुगार साहित्यही सापडले नाही.
यानंतर पोलिसांनी कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद होता. गावात चौकशी केली असता तो इसम हनुमान गजानन धुर्वे (वय 28, रा. कोपरा, ता. सेलु, जि. वर्धा) असल्याचे निष्पन्न झाले. चौकशी दरम्यान त्याने मद्यप्राशन केल्यामुळे विनाकारण खोटा कॉल केल्याची कबुली दिली.
याप्रकरणी त्याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा क्र. 0124/2025 भा.दं.सं. 2023 चे कलम 212 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या संदर्भात ठाणेदार प्रल्हाद मदन यांनी सांगितले की, “डायल 112 ही आपत्कालीन सेवा नागरिकांना तात्काळ मदत मिळावी म्हणून शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. या सेवेचा गैरवापर करून पोलिसांची दिशाभूल करू नये. खोटी माहिती दिल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”
सदर कारवाई पोलीस कर्मचारी आनंद भस्मे, राजेश कंगाले, बम्हानंद मुन, अनिल चिलगर, रूस्तम मुंगल, होमगार्ड सैनिक राहुल मडावी व मनिष थुल यांनी सहा. पोलीस निरीक्षक प्रल्हाद मदन यांच्या मार्गदर्शनाखाली केली.