कॉलरी परिसरात तरुणाची लूट : स्थानिक गुन्हे शाखेचा वेगवान तपास,दोनआरोपी अटकेत
प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
बल्लारपूर: कॉलरी मैदानाजवळ फिरण्यासाठी गेलेल्याlएका तरुणावर तिघा अज्ञात युवकांनी हल्ला करून त्याच्याकडील मोबाईल फोन आणि सोन्याची अंगठी लुटल्याची धक्कादायक घटना ९ ऑक्टोबर रोजी घडली. घटनेनंतर केवळ काही तासातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्पर कारवाई करत एक आरोपीला अटक करण्यात यश मिळविले असून, त्याचे दोन साथीदार फरार होते.तेलंगणा राज्यातील मंचेरियल जिल्ह्यातील रहिवासी विनय चंद्रय्या मुलकाला (वय २४) हा आपल्या बहिणीला भेटण्यासाठी ७ ऑक्टोबर रोजी बल्लारपूर येथे आला होता. त्याची बहिण व मेहुणे श्रीनिवास गद्देला हे सुभाष वॉर्ड, कॉलरी क्वार्टर येथे वास्तव्यास आहेत.गुरुवारी ९ ऑक्टोबर रात्री जेवणानंतर विनय मोबाईलवर बोलत कॉलरी माईनच्या दिशेने फिरत असताना तीन अज्ञात युवक अचानक त्याच्याजवळ आले. त्यांनी त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घेतला आणि सोन्याची अंगठी काढण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्यावर आरोपींनी विनयला मारहाण करून अंगठी लुटली आणि रेल्वे पटरीच्या दिशेने पळ काढला. विनयने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी जवळच उभी असलेली दुचाकी घेऊन फरार झाले.
या प्रकरणी विनय मुलकाला यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींचा शोध घेताना चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बल्लारपूर शहरात कारवाई करून सचिन तोकलवार (वय २४) रा. बल्लारपूर यास ताब्यात घेतले.चौकशीत त्याने आपल्या साथीदार करण जीवणे रा. बल्लारपूर व करण हजारे सह सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी सचिन यास वैद्यकीय तपासणीनंतर पुढील तपासासाठी बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. तर बल्लारपूर पोलीसांनी आरोपी करण हजारे यास अटक केले असून आरोपी करण जीवने फरार आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक दीपक काँक्रेडवार, सहायक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर, सफौ स्वामीदास चालेकर, पो. हवा किशोर वैरागडे, पो हवा अजय बागेश्वर, पोअं शेखर माथनकर, पोअं गोपीनाथ नरोटे यांनी केले.