गोंडपिपरीत वाघाच्या हल्ल्याने आठ दिवसात दोन शेतकऱ्यांचा बळी
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बळी गेल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. गणेशपिपरी येथील अल्का पेंदोर या महिलेला शेतात काम करत असताना वाघाने ठार केले. अवघ्या आठ दिवसांत दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने संतप्त नागरिकांनी प्रशासन आणि वनविभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडले.
रात्री उशिरा प्रशासनाने मृतदेह हटविल्यानंतर संताप अधिकच वाढला. आज सकाळपासून गणेशपिपरी व गोंडपिपरी परिसरात आक्रमक आंदोलन सुरू झाले असून नागरिकांनी अहेरी–नागपूर महामार्गावरील धाबा टर्निंग येथे चक्काजाम आंदोलन केले. तब्बल तीन तास वाहतूक ठप्प राहिल्याने परिसरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली.
संतप्त नागरिकांनी वाघ पकडला नाही, तर संपूर्ण तालुका रस्त्यावर उतरवू, असा इशारा दिला. गोंडपिपरी शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. आंदोलनादरम्यान नागरिकांनी वनविभाग व प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत निष्क्रियतेवर टीका केली.
वनविभागाचे अधिकारी, पोलीस व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तरीदेखील नागरिकांचा संताप ओसरण्याचे नाव घेत नाही.
गेल्या काही महिन्यांपासून गोंडपिपरी तालुक्यात वाघाचा मुक्त संचार सुरू असून शेतकरी वर्गावर त्याचा फटका बसत आहे. शेतात काम करणाऱ्या महिलांवर आणि शेतकऱ्यांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आंदोलकांनी फक्त सर्वेक्षण नव्हे, कृती दाखवा! अशी मागणी करत वनविभागावर निष्क्रियतेचा आरोप केला.शेतकरी मरतोय, पण अधिकारी फक्त बैठका घेतात, अशी टीका संतप्त नागरिकांनी केली.
दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष या घटनेकडे वेधण्यात आले असून वनविभागाच्या विशेष पथकाला घटनास्थळी पाठविण्यात आले आहे. मात्र, स्थानिक नागरिकांमध्ये विभागाच्या कार्यपद्धतीबद्दल अविश्वास कायम आहे.
गेल्या आठ दिवसांत दोन शेतकऱ्यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आहे. ही घटना ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत शासनाच्या निष्क्रियतेचे धक्कादायक चित्र उभे करत असून शासन व वनविभागाने तातडीने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.