वर्गणीच्या पैशावरून वाद,लोखंडी हत्याराने हल्ला करून तिघे जखमी
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर: राजेंद्र प्रसाद वार्डात वर्गणीच्या पैशांवरून निर्माण झालेल्या वादातून झालेल्या भांडणात लोखंडी हत्याराने हल्ला करून तिघे जखमी झाल्याची घटना ५ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी भारत सोपान बुटले (४०) यांनी बल्लारपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
प्रज्ञा चौकाजवळ संध्याकाळी ४.३० वाजताच्या सुमारास विशाल भिमराव पाझारे यांचा त्यांचे चुलत भाऊ अशोक बबन पाझारे व संदीप बबन पाझारे यांच्यात वर्गणीच्या पैशांवरून वाद झाला. या झगड्यात विशाल पाझारे यांनी घरातून लोखंडी हत्यार आणून अशोक पाझारे यांच्या कपाळावर वार केला. यात त्यांना गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला. तसेच संदीप पाझारे यांच्या उजव्या हाताच्या तळहातावरही हत्याराने प्रहार करण्यात आला.
दरम्यान, भांडण सोडविण्यास आलेले तक्रारदार भारत बुटले यांच्यावरही विशाल पाझारे यांनी त्याच हत्याराने वार करून उजव्या हाताला जखमी केले. घटनेनंतर जखमींना ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे नेण्यात आले. यातील अशोक व संदीप पाझारे यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे हलविण्यात आले होते.
या प्रकरणी पोलिसांनी कलम ११८(१), ३५२ बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.