दहेगाव गोसावी पोलिसांची कारवाई : सराईत गुन्हेगार दोन महिन्यांसाठी वर्धा जिल्ह्यातून तडिपार

Wed 24-Dec-2025,01:34 AM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक 

दहेगाव गोसावी (ता. सेलू) | दि. 22 डिसेंबर 2025 पोलीस स्टेशन दहेगाव गोसावी हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत आरोपीस वर्धा जिल्ह्यातून दोन महिन्यांसाठी हद्दपार (तडिपार) करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

दहेगाव गोसावी हद्दीत राहणारा आरोपी नरेश व्यंकटराव मोहिते (वय 38 वर्षे, रा. देऊळगाव, ता. सेलू, जि. वर्धा) याच्यावर पोलीस स्टेशन दहेगाव गोसावी, सेवाग्राम, वर्धा शहर, सेलू आदी पोलीस ठाण्यांत मालमत्तेविरुद्धचे, दारूबंदीचे, चोरीचे तसेच शरीराविरुद्धचे अनेक गुन्हे नोंद आहेत. आरोपीचे गावात वास्तव्य सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेस धोका ठरत असल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 (1)(अ) अन्वये प्रस्ताव तयार करून तो पोलीस अधीक्षक वर्धा व उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा यांच्यामार्फत मा. उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी वर्धा यांच्याकडे सादर करण्यात आला होता.

सदर प्रस्तावावर सुनावणी करून मा. उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी वर्धा, श्री. दीपक करांडे यांनी आदेश पारित करत आरोपी नरेश मोहिते यास दोन महिन्यांसाठी वर्धा जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सदर आरोपीस वर्धा जिल्ह्याबाहेर नागपूर जिल्ह्यात सोडण्यात आले आहे.

पोलीस स्टेशन दहेगाव गोसावी येथील ठाणेदारांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, हा इसम वर्धा जिल्ह्यात कुठेही दिसून आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन,अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मदन (ठाणेदार, पो.स्टे. दहेगाव गोसावी) यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार धमेंद्र तोमर, आनंद भस्मे, ब्रह्मानंद मुन, प्रदीप डोंगरे तसेच पोलीस अंमलदार नितीन डाखोळे, किरण आडे, अनिल चिलगर यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे