नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मद्यपान करून वाहन चालवू नका; वाहतूक नियम पाळण्याचे वाहतूक पोलिसांचे आवाहन

Tue 30-Dec-2025,10:01 PM IST -07:00
Beach Activities

वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधि युसूफ पठाण

वर्धा:वर्धा नवीन वर्ष २०२६ चे स्वागत आनंदात व उत्साहात करावे; मात्र मद्यपान करून वाहन चालवू नये, तसेच वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

उद्या ३१ डिसेंबर २०२५ हा वर्षाचा शेवटचा दिवस असून, नागरिकांनी उत्साहात अतिवेगाने वाहन चालवू नये, ट्रिपल सीट वाहन चालवू नये, तसेच मोठ्या आवाजाचे कर्णकर्कश सायलेंसर वापरून ध्वनीप्रदूषण करू नये. वाहन चालविताना इतर नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. दोषी आढळलेल्या वाहनचालकांवर गुन्हा दाखल करून वाहने जप्त केली जातील, याची सर्व वाहनचालकांनी नोंद घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे.

३१ डिसेंबर रोजी अपघात होऊ नयेत व वाहतूक सुरळीत राहावी यासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये प्रत्येकी दोन वाहतूक अंमलदार तैनात करण्यात येणार आहेत. बजाज चौक, बसस्टँड, आर्वी नाका चौक, छत्रपती शिवाजी चौक, आरती चौक, धुणीवाले मठ, निर्मल बेकरी चौक आदी गर्दीच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहतूक नियंत्रण केले जाणार आहे.

काही वाहनचालकांकडून नागरिकांना त्रास होत असल्यास त्यांनी निशुल्क सेवा क्रमांक ११२ वर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सन २०२५ मध्ये आतापर्यंत मद्यपान करून वाहन चालविताना आढळलेल्या २७६ वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांची वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे सर्व वाहनचालकांनी मद्यपान करून किंवा अतिवेगाने वाहन चालवू नये व वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेने केले आहे.

विलास पाटील

पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा