पैशाच्या वादातून जीवघेणा हल्ला,पोलीस कर्मचाऱ्यावर काठीने वार
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.
बल्लारपूर : पैशाच्या जुन्या व्यवहाराच्या वादातून थेट पोलीस कर्मचाऱ्यावर सार्वजनिक ठिकाणी जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना बल्लारपूर शहरात घडली असून, या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवसाढवळ्या शिवीगाळ, धमकी देत लाकडी काठीने वार करून मारहाण केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
उस्मान सादीक रफीक अहमद (५०) , रा. फुलसिंग नाईक वार्ड, बल्लारपूर हे पोलीस विभागात कार्यरत असून सध्या पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथे तैनात आहेत. आरोपी सारंग राहुलगडे (२६), रा. साईबाबा वार्ड, बल्लारपूर याच्याशी पूर्वी पैशाचे व्यवहार झाले होते.
हे व्यवहार पूर्ण झाल्यानंतरही आरोपीकडून वारंवार विनाकारण अपमानास्पद वर्तन, थुंकणे व शिवीगाळ सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास रेल्वे चौकातील चहाच्या टपरीवर आरोपीने तक्रारदारास पाहून थुंकत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी पाठलाग करत मुन्नी हॉटेलपर्यंत पोहोचला. तेथे हातात लाकडी काठी घेऊन बाहेर ये असे म्हणत तक्रारदारास धमकावले.
बाहेर आल्यानंतर आरोपीने अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली व काठीने जोरदार वार केला. हा वार तक्रारदाराच्या डाव्या हाताच्या दंडाला लागला. भांडण टाळण्यासाठी दूर जात असताना आरोपीने ढकलाढकली केल्याने तक्रारदार खाली कोसळले, ज्यामुळे त्यांच्या उजव्या पायाच्या घोट्याला गंभीर खरचटले.
हल्ल्यानंतर आरोपीने तुला पाहून घेईन अशी धमकी देत घटनास्थळावरून पलायन केले. या गंभीर घटनेप्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५१(२), ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रेमशाह सोयाम करीत आहेत.