१५ वर्षीय अल्पवयीन मुलाचा शोध घेण्यात पोलिसांना यश; आरोपी ताब्यात
वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसूफ पठाण
आर्वी (जि. वर्धा) : दिनांक ८ मे २०२५ रोजी दुपारी सुमारे १२ वाजता १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा घरातून कोणालाही न सांगता निघून गेला होता. सायंकाळपर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी गावात, मित्रांकडे व नातेवाईकांकडे शोध घेतला; मात्र तो मिळून आला नाही. अखेर अज्ञात इसमाने आमिष दाखवून फूस लावून अल्पवयीन मुलास पळवून नेल्याची तक्रार आर्वी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली.
तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. अल्पवयीन मुलाचा शोध न लागल्याने सदर गुन्हा पुढील तपासासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग करण्यात आला.पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल (भा.पो.से.) यांच्या विशेष सूचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांच्या संयुक्त पथकाने तांत्रिक विश्लेषण व खात्रीशीर मुखबिराच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
पोलिसांनी अत्यंत शिताफीने कारवाई करत अमरावती येथून अल्पवयीन मुलास सुरक्षित ताब्यात घेतले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सदर मुलास त्याच्या वडिलांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले.
ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुभाष राऊत, पोलीस हवालदार दिवाकर परिमल, संजय राठोड, नितेश मेश्राम, पोलीस शिपाई नवनाथ मुंडे (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष) तसेच सायबर सेलचे दिनेश बोथकर, अक्षय राऊत व गोविंद मुंडे यांनी संयुक्तपणे पार पाडली.