“वर्धा युथ फेस्ट 2026”मुळे युवक नेतृत्वाला नवी दिशा
“वर्धा युथ फेस्ट 2026”मुळे युवक नेतृत्वाला नवी दिशा
वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसूफ पठाण
वर्धा, फेब्रुवारी २०२६ — “वर्धा युथ फेस्ट 2026”च्या यशस्वी आयोजनामुळे जिल्ह्यातील युवकांमध्ये देशभक्ती, नेतृत्व कौशल्य आणि राष्ट्रीय जबाबदारीची नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. तीन दिवसीय या महोत्सवात १४ विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वर्ध्यातील सुमारे २७ शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी तसेच हजारो नागरिकांनी या कार्यक्रमांचा लाभ घेतला.
विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून आयोजित या महोत्सवात शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स आणि स्थानिक युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. शारीरिक क्षमता, नेतृत्वगुण आणि राष्ट्रभक्तीचा संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला.
Central Ammunition Depot Pulgaon यांच्या वतीने आयोजित “Who Dares Wins” ही लष्करी आव्हानात्मक स्पर्धा तसेच Indian Air Force तर्फे सादर करण्यात आलेले एरो मॉडेलिंग व ड्रोन प्रात्यक्षिक हे महोत्सवातील प्रमुख आकर्षण ठरले. या माध्यमातून युवकांना संरक्षण सेवेकडे प्रेरित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
उद्घाटन समारंभ Archaeological Survey of India चे अतिरिक्त महासंचालक डॉ. आलोक त्रिपाठी यांच्या हस्ते झाला. समारोप सोहळ्यास ब्रिगेडियर प्रशांत कुमार, ग्रुप कॅप्टन खुशाल व्यास, स्क्वॉड्रन लीडर विकास कुमार आणि विंग कमांडर व्ही. दीपिका राव यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले. संरक्षण क्षेत्रातील संधी व तयारीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
महोत्सवातील “युथ पार्लमेंट” हा नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरला. ग्रामीण व शहरी भागातील युवकांनी राष्ट्रीय प्रश्न, लोकशाही व्यवस्था आणि शासन प्रणालीवर प्रभावी मते मांडली. “वर्धाज गॉट टॅलेंट” या उपक्रमातून युवकांना त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ मिळाले. डिजिटल माध्यमांद्वारे संपूर्ण महोत्सव हजारो युवकांपर्यंत ऑनलाइन पोहोचविण्यात आला.
Youth Peace Foundation चे अध्यक्ष व महोत्सवाचे संस्थापक सारंग रघाटाटे यांनी सांगितले की, “वर्धा युथ फेस्ट हा केवळ कार्यक्रम नसून युवकांमध्ये धैर्य, नेतृत्व आणि राष्ट्रीय जबाबदारी जागृत करणारी चळवळ आहे.”
या उपक्रमाला वर्ध्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर तसेच देवळी–पुलगावचे आमदार राजेश बकाने यांनी शुभेच्छा दिल्या.
भविष्यात हा महोत्सव राज्यस्तरीय व राष्ट्रीय युवक नेतृत्व मंच म्हणून विकसित करण्याची घोषणा आयोजन समितीने केली आहे. देशरक्षण जागृती, उद्योजकता आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांचा अधिक व्यापक समावेश करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
ओम भेदूरकर, प्रतीक पवार, उज्वल ठाकरे, साहिल दरणे, यश देशमुख, भूषण अलोने, कौस्तुभ दाणी, अभिषेक उरकुडे, फाल्गुनी आत्राम, रीशिका छत्तानी, उत्कर्षा चाचरे, ओजस राऊत, ओम गवारले तसेच सुमारे १२४ युवक-युवतींनी या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी पार पाडली. नागरिक, शैक्षणिक संस्था व प्रायोजकांच्या सहकार्यामुळे हा महोत्सव अभूतपूर्व यशस्वी ठरला.