शाळेत महिला मदतनीसाचा विनयभंग; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
शाळेत महिला मदतनीसाचा विनयभंग; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
हिंगणघाट (प्रतिनिधी – निखिल ठाकरे) : हिंगणघाट तालुक्यातील कान्हापूर परिसरातील जिल्हा परिषद शाळेत महिला मदतनीसासोबत विनयभंग झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. शाळेसारख्या संवेदनशील ठिकाणीच हा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पीडित महिला मागील सहा वर्षांपासून संबंधित शाळेत मदतनीस म्हणून कार्यरत असून विद्यार्थ्यांसाठी खिचडी तयार करणे व वाटप करण्याचे काम ती करत होती. शाळेत एकच वर्गखोली असून त्याच ठिकाणी स्वयंपाक व अध्यापन चालते. शाळेत सुमारे १२ विद्यार्थी असून संबंधित शिक्षक २०१८ पासून येथे कार्यरत आहेत.
तक्रारीनुसार, गेल्या महिनाभरापासून आरोपी शिक्षकाने महिलेबरोबर गैरवर्तन करण्यास सुरुवात केली होती. वारंवार जवळ येणे, हात पकडणे, कवटाळण्याचा प्रयत्न करणे तसेच जबरदस्तीने विनयभंग करणे असे प्रकार सुरू होते. सुरुवातीला महिलेने विरोध केला, मात्र बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कुणालाही सांगितला नव्हता.
दरम्यान, २७ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजता महिला शाळेत खिचडी तयार करत असताना आरोपी शिक्षक तिच्याजवळ आला. त्या वेळी काही विद्यार्थी शाळेच्या व्हरांड्यात उपस्थित होते. याच दरम्यान आरोपीने महिलेचा हात पकडून तिला कवटाळले तसेच अश्लील वक्तव्य करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने धैर्याने प्रतिकार करून स्वतःची सुटका करून घेतली व घरी जाऊन पतीला संपूर्ण घटना सांगितली.
यानंतर काही दिवस महिला शांत राहिली, मात्र आरोपीचे धाडस वाढत असल्याचे लक्षात येताच तिने अखेर पतीसह हिंगणघाट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ३० मार्च २०२६ रोजी याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत संबंधित कलमान्वये आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार पद्माकर मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश इटकल करीत आहेत.