रामनगर गुन्हे शोध पथकाची कारवाई : मोटारसायकल चोरी प्रकरणी युवक अटकेत
रामनगर गुन्हे शोध पथकाची कारवाई : मोटारसायकल चोरी प्रकरणी युवक अटकेत
वर्धा | प्रतिनिधी (युसूफ पठाण)
रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरी प्रकरणी एका युवकाला अटक करून चोरीची दुचाकी जप्त केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी आर्वी नाका परिसरातील मशिदीजवळ पप्पू शेख यांच्या घरी भाड्याने राहत असून, त्यांनी १५ मार्च रोजी रात्री सुमारे १० वाजता आपली काळ्या रंगाची बजाज पल्सर १५० (क्र. एमएच ३२ टी २४५०) ही मोटारसायकल घरासमोर उभी केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर जाण्यासाठी बाहेर आले असता सदर मोटारसायकल चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही वाहन न मिळाल्याने २५ मार्च रोजी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
दरम्यान, गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक इसम पिपरी मेघे येथून आर्वी नाका रोडवर चोरीची मोटारसायकल ढकलत नेत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून साहिल वाघ्या सातपुते (वय १९, रा. वडार झोपडपट्टी, आर्वी नाका, वर्धा) याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने १६ मार्च रोजी पहाटे सुमारे २ वाजताच्या सुमारास सदर मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीकडून मोटारसायकल जप्त करून त्याला अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मक्केश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अजय भुसारी यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील पो.ह.का. गजानन इवनाथे, पोलीस नाईक राजू शाहू, अजहर खान, सचिन पवार, राहुल भोयर, रुपेश उगेमुगे व सुरज राठोड यांनी पार पाडली असून पुढील तपास सुरू आहे.