शेती साहित्य चोरी टोळी जेरबंद; ₹१.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Fri 27-Mar-2026,03:57 AM IST -07:00
Beach Activities

शेती साहित्य चोरी टोळी जेरबंद; ₹१.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

वर्धा (युसूफ पठाण) : सेलू पोलीस ठाणे हद्दीतील शेतातील बांध व फार्महाऊस फोडून शेती उपयोगी साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी यशस्वी पर्दाफाश केला. या कारवाईत एकूण ₹१,५०,९५० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात श्री अश्वय सुरेश झाडे (रा. रेहकी, ता. सेलू) व श्री पनश्याम मानिकराव बोरकर (रा. पवनार, जि. वर्धा) यांनी तक्रार दाखल केली होती. अज्ञात आरोपींनी त्यांच्या शेतातील बांध व फार्महाऊसचे कुलूप तोडून शेती साहित्य चोरी केल्याची नोंद अपराध क्र. २०४/२६ व १५९/२६, कलम ३०५(अ), ३३४(१) बी.एन.एस. अंतर्गत करण्यात आली होती.

स्थानिक गुन्हे शाखेकडून गोपनीय माहिती, तांत्रिक तपास व गुन्हेगारांच्या नोंदींच्या आधारे तपास करण्यात आला. यामध्ये सुनिता सुनिल लष्कर, अंजली गोविंद चव्हाण, निशा रामा मुळे, पूजा शंकर दांडेकर व शंकर प्रभुजी दांडेकर (सर्व रा. वर्धा परिसर) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

चोरी केलेले साहित्य ऑटो रिक्षाद्वारे नेऊन भंगार विक्रेत्यास विकल्याचेही तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी ऑटो चालक आकाश बालाजी वाकेकर व भंगार व्यापारी शेख नवी शेख मेहबूब यांचाही समावेश आहे.

पोलीसांनी आरोपींकडून शेती उपयोगी साहित्य (लोखंडी वखराचे फासे, रिंगा, विळे आदी), पितळी स्प्रिंकलर नोझल, हिरो कंपनीची मेस्ट्रो मोपेड व तीन चाकी ऑटो रिक्षा असा एकूण ₹१,५०,९५० किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक राहुल इटेकर तसेच पोलीस अंमलदार सचिन इंगोले, चंद्रकांत बुरंगे, भूषण निघोट, प्रमोद पिसे, अमोल नगराळे, मंगेश चावरे, अरविंद इंगोले, राहुल अधवाल, रितेश गेटमे व महिला पोलीस अंमलदार पियुषा धोटे यांच्या पथकाने पार पाडली.

अटक आरोपींना पुढील तपासासाठी सेलू पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.