पोलीस असल्याचे भासवून 1.20 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Sat 28-Mar-2026,08:11 AM IST -07:00
Beach Activities

पोलीस असल्याचे भासवून 1.20 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

नावेद पठाण मुख्य संपादक सावंगी मेघे 

सावंगी मेघे परिसरात पोलिसांची बतावणी करून नागरिकाची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात अज्ञात तिघांनी मिळून एका शेतकऱ्याकडील सुमारे 1 लाख 20 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लबाडीने चोरून नेल्याची तक्रार नोंद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार राजू कृष्णराव भांगे (वय 58, रा. निजामपूर टाकळी, ता. आर्वी, जि. वर्धा) हे 27 मार्च रोजी सावंगी मेघे येथील रुग्णालयात मुलीची तब्येत पाहण्यासाठी आले होते. दुपारी सुमारास ते आपल्या दुचाकीने (फॅशन) गावाकडे परत जात असताना सालोड ते दहेगाव स्टेशन रोडवरील नायरा डेपोसमोर तीन अज्ञात इसमांनी त्यांना अडवले.

या तिघांपैकी दोघे जण काळ्या रंगाच्या बाईकवर तर एक जण पांढऱ्या अॅक्टिव्हावर होता. त्यांनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगून तक्रारदाराला थांबवले. तसेच “आमचे अधिकारी पुढे उभे आहेत, तुमच्याकडे सोने असेल तर ते काढून द्या” असे सांगत विश्वास संपादन केला.

त्यानंतर तक्रारदाराने आपल्या गळ्यातील सुमारे 30 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी (अंदाजे किंमत 90 हजार रुपये) आणि उजव्या हातातील 10 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (अंदाजे किंमत 30 हजार रुपये) काढून दिली. आरोपींनी ते सोने कागदात बांधून पुडी करून परत दिल्याचा बहाणा केला आणि तेथून पसार झाले.

काही अंतरावर गेल्यानंतर संशय आल्याने तक्रारदाराने पुडी उघडून पाहिली असता त्यात बनावट दागिने असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी नातेवाईकांना माहिती देऊन सावंगी मेघे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. परिसरातील नागरिकांनी अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे