आंबेडकर चौक सौंदर्यीकरणाच्या कामाला गती द्या; शिवसेना महिला आघाडीचे नगरपालिकेला निवेदन
आंबेडकर चौक सौंदर्यीकरणाच्या कामाला गती द्या; शिवसेना महिला आघाडीचे नगरपालिकेला निवेदन
हिंगणघाट : प्रतिनिधी – मंगेश लोखंडे
दि. २५ मार्च २०२६ रोजी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने हिंगणघाट नगरपालिकेला निवेदन देत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाला गती देण्याची मागणी करण्यात आली.
महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ. शुभांगीताई ठमेकर व उपजिल्हाप्रमुख (हिंगणघाट विधानसभा) अमित गावंडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी उरकुडे साहेब व उपनगराध्यक्ष निलेशभाऊ ठोंबरे यांना हे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात सौंदर्यीकरणाच्या कामात होत असलेली चालढकल व कामाच्या गतीत झालेली मंदी याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.
येत्या १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्या पार्श्वभूमीवर काम वेळेत पूर्ण होणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावर मुख्याधिकारी व उपनगराध्यक्ष यांनी १० एप्रिल २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शताब्दी वर्षानिमित्त मुख्याधिकाऱ्यांना शिवसेना पक्षातर्फे त्यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
यावेळी सौ. शुभांगीताई ठमेकर, अमित गावंडे, अमोल देशपांडे (युवासेना उपतालुकाप्रमुख) यांच्यासह मंदाकिनी ढाले, पल्लवी सराटे, हेमलता मेश्राम, ललिता कैकाडे, अश्विनी गेडाम, निकिता काळे, अनुष्का जांभुळकर, सुनिता भितघरे, प्रियंका कैकाडे, सोनाली बालपांडे, पूनम काटकर, रोशनी वाघमारे, वैशाली ढाले, विभा कापटे आदी महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.