बाभुळगाव शिवारात नदी पात्र अरुंद,प्लॉटींगमुळे शेती व गावाला पुराचा गंभीर धोका

Fri 20-Mar-2026,11:26 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:- अशोक इंगोले हिंगोली 

वसमत तालुक्यातील जवळा तर्फे बाभुळगाव शिवारात “हायटेक सिटी” व “सप्तगिरी” या नावाने सुरू असलेल्या प्लॉटींगमुळे स्थानिक शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित प्लॉटींग मालकांनी शिवारातून जाणाऱ्या नदीच्या नैसर्गिक पात्रात दगड, माती व मुरुम टाकून नदीचा प्रवाह अडवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे नदीचे पात्र अरुंद झाले असून पावसाळ्यात पाणी नैसर्गिकरित्या वाहून जाण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे. परिणामी, गेल्या पावसाळ्यात नदीला आलेल्या पुराचे पाणी शेतांमध्ये साचून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. तसेच काही ठिकाणी गावातील घरांमध्येही पाणी शिरल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले होते.

गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी संबंधित प्लॉटींग मालकांना वारंवार विनंती करूनही रात्रीच्या वेळी मुरुम व इतर साहित्य टाकून नदीचे स्वरूप बदलण्याचे काम सुरूच असल्याचा आरोप आहे. त्यामुळे आगामी पावसाळ्यात अधिक मोठ्या पुराचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तहसीलदारांकडे लेखी अर्ज सादर करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच नदीचे मूळ पात्र नकाशानुसार मोकळे करून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह कायम ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे.

यासंदर्भात प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ती पावले उचलावीत, अन्यथा शेती, मालमत्ता आणि जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.