गांजा तस्करी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; दोन आरोपींना अटक, मुद्देमाल जप्त
गांजा तस्करी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; दोन आरोपींना अटक, मुद्देमाल जप्त
नावेद पठाण मुख्य संपादक
वर्धा :अंमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत दि. २४ मार्च २०२६ रोजी करण्यात आलेल्या कारवाईत दोन आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन सेलू हद्दीतील मौजा हिंगणी, वॉर्ड क्रमांक १ येथे गिताबाई हरिभाऊ चुटके यांच्या राहत्या घरी छापा टाकण्यात आला. यावेळी संबंधित महिला व तिचा नातजावई रौशन कुमार उर्फ रोशनसिंग तुलसी सहाणी (रा. अमृत कॉलनी, लुधियाना, पंजाब; सध्या हिंगणी) हे संगनमताने गांजा विक्री करताना रंगेहात आढळून आले.
पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून १ किलो ६० ग्रॅम गांजा तसेच एक मोबाईल असा एकूण सुमारे ५६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासादरम्यान हा गांजा गणेशनगर, सातगाव (बुटीबोरी) येथील मधु गुजरकर नावाच्या इसमाकडून मिळाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन सेलू येथे एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात स.पो.नि. आशिषसिंग ठाकूर, पो.उपनि. प्रकाश लसुंते तसेच कर्मचारी अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अभिषेक नाईक आणि प्रिती धवळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.