हिंगणघाटमध्ये शिवसेना महिला आघाडीची नवी कार्यकारिणी जाहीर; पदाधिकाऱ्यांचा उत्साहात शपथविधी

Thu 26-Mar-2026,03:35 AM IST -07:00
Beach Activities

हिंगणघाटमध्ये शिवसेना महिला आघाडीची नवी कार्यकारिणी जाहीर; पदाधिकाऱ्यांचा उत्साहात शपथविधी

हिंगणघाट :प्रतिनिधी – मंगेश लोखंडे

हिंगणघाट येथे शिवसेना महिला आघाडीची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला.

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या “८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण” या विचारसरणीचा वारसा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवसेना पक्षाच्या प्रतोद व संपर्क नेत्या, विधानपरिषद आमदार डॉ. मनीषाताई कायंदे तसेच वर्धा लोकसभा संपर्कप्रमुख राजजी दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

दि. २६ मार्च २०२६ रोजी कारंजा चौक येथील सारा हॉटेल येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ. शुभांगीताई ठमेकर व उपजिल्हाप्रमुख अमित गावंडे (हिंगणघाट विधानसभा) उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान अमित गावंडे यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या व पक्षाचे ध्येय-धोरण समजावून सांगितले. तर शुभांगीताई ठमेकर यांनी सर्व नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून महिला आघाडी अधिक बळकट करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

या छोटेखानी सभेमुळे उपस्थित महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रमेशभाऊ ढाले यांनी केले.