दारूच्या नशेत बुलेट चालवणाऱ्या चालकावर कडक कारवाई
दारूच्या नशेत बुलेट चालवणाऱ्या चालकावर कडक कारवाई
वर्धा (जिल्हा विशेष प्रतिनिधी – युसुफ पठाण) : दि. २६ मार्च २०२६ रोजी पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार शहरात वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी बजाज चौक येथे वाहतूक शाखेकडून नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली.
नाकाबंदी दरम्यान एक बुलेट चालक अतिवेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवताना आढळून आला. वाहतूक पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असता त्याच्याकडून दारूचा वास येत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत संबंधित चालक आशिष बाबाराव सायरे (वय ३४, रा. जामणी, ता. सेलू) हा दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याचे स्पष्ट झाले.
यावरून संबंधित चालकाविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची बुलेट मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धीरज पांडे, अनिल तिवारी, विजय डोळे व सय्यद शब्बीर यांनी बजाज चौक येथे यशस्वीरित्या पार पाडली.
वाहतूक शाखेचे आवाहन :
सर्व वाहन चालकांनी दारू पिऊन वाहन चालवू नये. स्वतःच्या व इतरांच्या जीवितास धोका होणार नाही, याची दक्षता घ्यावी.