अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; वन विभागात खळबळ

Sun 05-Apr-2026,05:57 AM IST -07:00
Beach Activities

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; वन विभागात खळबळ

वर्धा, दि. ५ एप्रिल | जिल्हा विशेष प्रतिनिधी – युसुफ पठाण

वर्धा जिल्ह्यातील सहवन क्षेत्रांतर्गत अंजी बिटा, मौजा दिग्रासजवळ समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ४ एप्रिल २०२६ रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे वन विभागात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, क्यूआरव्ही पथक व अग्निशमन दलाला रस्त्यावर एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. त्यानंतर तात्काळ वन विभागाला याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान चेन क्रमांक ६४/८०० जवळ मध्यरेषेवर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.

वन विभागाने घटनास्थळाचा पंचनामा करून राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार वन गुन्हा नोंदवला. त्यानंतर ५ एप्रिल रोजी सकाळी वर्धा येथील पशुवैद्यकीय अधिकारी कार्यालयात बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले.

या वेळी सहाय्यक वनसंरक्षक एम. के. आडे, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. एस. भालवी, मानद वन्यजीव रेंजर कौशल मिश्रा, एनटीसीए सदस्य आशीष गोस्वामी, अभिषेक खेडुलकर (एनजीओ) तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. डी. मडावी, डॉ. प्रणिता पंतावणे, डॉ. हर्षा अंधारे आणि डॉ. अक्षय गिरी (पीपल फॉर अॅनिमल्स) उपस्थित होते.

शवविच्छेदनादरम्यान आवश्यक नमुने तपासणीसाठी सुरक्षित ठेवण्यात आले असून, एनटीसीएच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बिबट्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास उपवनसंरक्षक हरवीर सिंह व सहाय्यक वनसंरक्षक एच. एस. सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. एस. भालवी, क्षेत्रीय सहाय्यक ए. एल. जाधव, वनरक्षक एम. एस. माने, ए. जे. गीते आणि एस. सी. तबांडे यांचे पथक तपासात गुंतले आहे.

दरम्यान, वन विभागाने अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरू केला असून, नागरिकांनी अशा घटना त्वरित कळवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.