वसमतमध्ये दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश;पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Wed 13-May-2026,12:37 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी :- अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली:हिंगोली जिल्ह्यात मालमत्तेविरोधातील गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत वसमत येथे स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. शटर फोडून चोरी करणाऱ्या तसेच दरोड्याच्या तयारीत असलेल्या अट्टल आरोपींच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद करत सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पथकाकडून मालाविरुद्धच्या गुन्ह्यांचा तपास सुरू होता. दि. ११ मे २०२६ रोजी वसमत शहरात शटर फोडून शेतकऱ्याची हळद चोरी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे एक पिकअप वाहनही चोरीला गेले होते. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि शिवसांब घेवारे यांच्या पथकाकडे सोपविण्यात आला होता.

पथकाने घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी वसमत-परभणी महामार्गावर दरोड्याच्या उद्देशाने काटेरी फांद्या टाकून थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून छापा टाकत पाच आरोपींना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जसविंदर सिंग उर्फ जस्सु रघुवीरसिंग चव्हाण (वय २२), बादलसिंग रणजितसिंग चव्हाण (वय १९), दिलीपसिंग चव्हाण, अजयसिंग सुरेशपाल चावरीया तसेच एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. सर्व आरोपी हे वसमत येथील रेल्वे स्टेशन रोड परिसरातील शिकलकरी वस्तीत राहणारे आहेत.

पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी वसमत शहरातील तीन व आखाडा बाळापूर येथील एका घरफोडीसह एक पिकअप वाहन चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून सुमारे तीन लाख रुपयांची हळद, रोख रक्कम, सोन्याचे दागिने तसेच चोरीचे पिकअप वाहन असा एकूण अंदाजे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपी क्रमांक ३ व ४ यांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला असून उर्वरित आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हा उघड करून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.