कराटे खेळाडूंचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

Fri 22-May-2026,06:41 AM IST -07:00
Beach Activities

कराटे खेळाडूंचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

खेळाडूंना करिअर घडविण्याची मोठी संधी उपलब्ध : पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

वर्धा : पूर्वी “खेळाल तर बिघडाल” अशी मानसिकता समाजात होती. मात्र जागतिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे क्रीडा क्षेत्राचे स्वरूप पूर्णपणे बदलले असून, आज खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन न राहता करिअर घडविण्याचे प्रभावी माध्यम बनले आहे. क्रीडा क्षेत्रात आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आज विविध संधी उपलब्ध होत असून, उज्ज्वल भविष्य घडविण्याची मोठी संधी खेळाडूंना प्राप्त होत आहे, असे प्रतिपादन जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केले.

ते २१ मे रोजी शहीद हुतात्मा स्मारक परिसरात आयोजित लॉयन्स ट्रेडिशनल कराटे-डो असोसिएशनच्या खेळाडू गुणगौरव सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी मंचावर वर्ध्याचे नगराध्यक्ष डॉ. सुधीर पांगुळ, युनिव्हर्सल मार्शल आर्ट स्पोर्ट इंडिया चे राष्ट्रीय सल्लागार इमरान राही, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, लॉयन्स क्लबचे अध्यक्ष निखिल रोकडे, माजी अध्यक्ष विजय सत्यम, कोषी उल्हास वाघ, लीलाताई वाघ, अभिजित रघुवंशी, अभिजीत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष डॉ. सुधीर पांगुळ यांनी क्रिकेट, बॅडमिंटन, कुस्ती, कराटे, टेनिस यांसारख्या विविध खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून खेळाडू राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करू शकतात, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाची प्रास्ताविक करताना युनिव्हर्सल मार्शल आर्ट अकॅडेमीचे राष्ट्रीय सल्लागार इमरान राही यांनी सांगितले की, शहरी व ग्रामीण भागातील खेळाडूंना आता विविध व्यासपीठे उपलब्ध होत आहेत. क्रीडा क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी कठोर परिश्रम, शिस्त आणि योग्य प्रशिक्षण आवश्यक आहे. गेल्या ४५ वर्षांपासून देशातील सुप्रसिद्ध कराटे प्रशिक्षक कोषी उल्हास वाघ यांनी अनेक खेळाडूंना उज्ज्वल भविष्यासाठी मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

कार्यक्रमाचे संचालन सेन्साई अमोल मानकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन कोषी उल्हास वाघ यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन यादव, सुनील पाटील, रितेश गावंडे, संग्राम मोहिते, वेदांत चौधरी, रेखा वाघ, विक्रांत गव्हाने, कल्याणी खडसे, प्रेम कवर, आर्यन छापेकर, मिहीर वाघ, धनश्री मेंढे, वैष्णवी पांडे आणि तनुश्री पांडे यांनी अथक परिश्रम घेतले.