वसमतमध्ये अवैध माती वाहतुकीविरोधात नागरिक आक्रमक

Fri 22-May-2026,11:27 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली 

उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण; प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी 

हिंगोली : वसमत तालुक्यात सुरू असलेल्या अवैध माती उत्खनन व बेकायदेशीर वाहतुकीविरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आंदोलन सुरू केले आहे. “प्रशासन झोपेत, माती माफिया जोमात” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला असून आंदोलनामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर मातीचे अवैध उत्खनन करून ती वीटभट्ट्यांवर साठवली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. दररोज शेकडो हायवा आणि टिप्परद्वारे मातीची वाहतूक होत असल्याने रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच वाढत्या अवजड वाहतुकीमुळे अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याची तक्रार करण्यात आली.

आंदोलनकर्ते गौतम मारोतराव दिपके आणि सुमेध श्रीरंग मस्के यांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत, “अवैध माती वाहतूक खुलेआम सुरू असताना प्रशासन मात्र मौन बाळगून आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असूनही संबंधित विभाग कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत,” असा संताप व्यक्त केला.

आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या

अवैध माती उत्खनन व वाहतूक तात्काळ बंद करावी

वीटभट्ट्यांवरील अवैध माती जप्त करून संबंधित भट्ट्या सील कराव्यात

माती माफिया, वाहन मालक व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत

कायमस्वरूपी तपासणी पथक नियुक्त करावे

नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या हायवा व टिप्परवर कठोर कारवाई करावी

“प्रशासनाने तातडीने ठोस कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण वसमत तालुक्याचे लक्ष लागले आहे.