बोगस खत प्रकरणात एफआयआर का नाही? शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा कृषी अधिकाऱ्यांना अल्टिमेटम

Fri 05-Jun-2026,05:33 AM IST -07:00
Beach Activities

बोगस खत प्रकरणात एफआयआर का नाही? शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा कृषी अधिकाऱ्यांना अल्टिमेटम

वर्धा, प्रतिनिधी – युसूफ पठाण

नाचणगाव येथे उघडकीस आलेल्या बोगस एनजीपी खत प्रकरणातील संबंधित उत्पादक, विक्रेते, दुकानदार तसेच गोदाम मालकांवर अद्यापही गुन्हे दाखल करण्यात आले नसल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधितांवर तातडीने एफआयआर नोंदवून कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.

या मागणीसंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हा कृषी अधिकारी, वर्धा यांना अल्टिमेटमचे निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाप्रमुख अनंत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमोद बोंबले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख सतीश बोरसे पाटील यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नाचणगाव येथे मोठ्या प्रमाणात बोगस एनजीपी खताचा साठा पकडण्यात आला होता. मात्र, या प्रकरणातील उत्पादक, विक्रेते, दुकानदार तसेच गोदामासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या मालकाविरोधात अद्याप कोणतीही एफआयआर नोंदविण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, येत्या आठ दिवसांत संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात आली नाही, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.

यावेळी अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख शेख अखिल, राम कैकाडी, अक्षय गुप्ता, मनोज वरकडे, मोहन भरणे, धीरज काळे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.