वर्धा जिल्हा पोलीस दलातील सहा अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ उत्साहात संपन्न

Mon 01-Jun-2026,11:07 PM IST -07:00
Beach Activities

वर्धा जिल्हा पोलीस दलातील सहा अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ उत्साहात संपन्न

वर्धा | शहर प्रतिनिधी : अमन नारायणे

वर्धा जिल्हा पोलीस दलातील सहा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ सोमवार, दि. १ जून २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील ‘क्राईम मिटिंग हॉल’ येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नियत वयोमानानुसार ३१ मे २०२६ रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमास पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, विविध शाखांचे प्रमुख, अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये ग्रेड पोलीस उपनिरीक्षक कल्याण रोठे (पोलीस मुख्यालय, वर्धा), ग्रेड पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लसुते (स्थानिक गुन्हे शाखा), ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विजय निकम (एम.टी. विभाग), सहाय्यक फौजदार प्रकाश कोवे (पोलीस स्टेशन पुलगाव), सहाय्यक फौजदार श्रीकांत सातपुते (बी.डी.डी.एस.) तसेच पोलीस हवालदार गणेश मेश्राम (एम.टी. विभाग) यांचा समावेश आहे.

समारंभादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. पोलीस दलातील त्यांच्या प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ व उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचीही उपस्थिती लक्षणीय होती. ग्रेड पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लसुते यांची कन्या प्राप्ती लसुते तसेच सहाय्यक फौजदार श्रीकांत सातपुते यांचे सुपुत्र आर्यन सातपुते यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आपल्या पालकांच्या सेवाकार्यातील योगदानाचा गौरव केला. त्यांच्या मनोगताने उपस्थितांचे मन भारावून गेले.

कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखांतील अधिकारी, कर्मचारी व मंत्रालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ सेवेला सलाम; पोलीस दलाकडून शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव