बल्लारपूरात कटर ने हल्ला,तरुण गंभीर जखमी,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Thu 04-Jun-2026,11:18 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : शहरातील सरदार पटेल वॉर्ड परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर कटरने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना आज, गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या हल्ल्यात श्रवण फगुना वर्मा (३५) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या छातीपासून पाठीपर्यंत खोल जखम झाली आहे. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना १५ टाके घातले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रवण वर्मा हे आपल्या आई व भावासह सरदार पटेल वॉर्ड परिसरात राहतात. ३ जून रोजी रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास शेजारी राहणारा सुनिल उर्फ टिल्ला बालकिशन वर्मा हा मद्यधुंद अवस्थेत त्यांच्या घरी आला. कोणतेही कारण नसताना त्याने शिवीगाळ करत श्रवण यांना लाथ मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दुसऱ्या दिवशी, आज ४ जून रोजी सकाळी सुमारे ६ वाजता श्रवण वर्मा हे मित्रांसोबत आंबेडकर पुतळ्यासमोरील चहाच्या दुकानातून परतत असताना त्यांची सुनिल उर्फ टिल्ला याच्याशी भेट झाली. मागील रात्री झालेल्या प्रकाराबाबत जाब विचारल्यानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला. यावेळी दोघांनी एकमेकांचे शर्ट पकडल्याने धक्काबुक्की झाली.

यानंतर काही वेळाने सुनिल उर्फ टिल्ला हा श्रवण यांच्या घरासमोर आला. जुन्या वादाचा राग मनात धरून त्याने श्रवण यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर हातातील कटरने त्यांच्या डाव्या छातीवर वार केला. हा वार छातीपासून पाठीपर्यंत गेल्याने श्रवण गंभीर जखमी झाले.

घटनेदरम्यान परिसरातील राहुल सेजल वर्मा हा मदतीसाठी धावून आला. त्याला पाहताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. जखमी अवस्थेतील श्रवण यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून गंभीर जखमेमुळे १५ टाके घालण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी श्रवण वर्मा यांच्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलीस ठाण्यात सुनिल उर्फ टिल्ला बालकिशन वर्मा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ३५१ आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.