अवैध गावठी मोहावर सावंगी (मेघे) पोलिसांची धडक कारवाई

Thu 04-Jun-2026,04:31 AM IST -07:00
Beach Activities

अवैध गावठी मोहावर सावंगी (मेघे) पोलिसांची धडक कारवाई

₹१.२६ लाखांचा कच्चा मोह सडवा रसायनसाठा जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण

सावंगी (मेघे) पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या साठवून ठेवलेल्या गावठी मोह दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मोह सडवा रसायनावर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल ₹१ लाख २६ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. ३ जून २०२६ रोजी सावंगी (मेघे) पोलीस स्टेशनचे पथक परिसरात गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मौजा मांडवा येथील रहिवासी विनोद मेघराम याने गावातील मोती नाल्याच्या काठावरील मोकळ्या जागेत गावठी मोह दारू निर्मितीसाठी कच्चा मोह सडवा रसायन साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी छापा टाकला. तेथे प्लास्टिक व लोखंडी ड्रममध्ये मोठ्या प्रमाणात कच्चा मोह सडवा रसायन साठवून ठेवलेले आढळून आले. कारवाईदरम्यान ५०० लिटर कच्चा मोह सडवा रसायन (किंमत ₹१,००,०००), १०० लिटर रसायन (किंमत ₹२०,०००), १० प्लास्टिक ड्रम (किंमत ₹५,०००) आणि एक लोखंडी ड्रम (किंमत ₹१,०००) असा एकूण ₹१,२६,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी पंचनामा करून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे तथा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत ठाणेदार विनोद गिरी, पोहेकॉ अभय खोब्रागडे (ब.नं. २७४), पोशी श्याम सलामे (ब.नं. १६५४) आणि पोशी गिरीश नरसाळे (ब.नं. ६८१) यांनी सहभाग घेतला.