तायक्वांदो खेळाला प्रोत्साहन देणे काळाची गरज : डॉ. सुधीर पांगुळ
तायक्वांदो खेळाला प्रोत्साहन देणे काळाची गरज : डॉ. सुधीर पांगुळ
तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे खेळाडूंचा सत्कार
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
वर्धा | तायक्वांदोसारख्या खेळांचे प्रशिक्षण लहान वयात दिल्यास मुलांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि योग्य निर्णयक्षमता विकसित होते. आजच्या काळात विशेषतः मुली आणि महिलांसाठी आत्मसंरक्षणाचे कौशल्य अत्यंत आवश्यक आहे. तायक्वांदो हा केवळ शारीरिक तंदुरुस्तीचा खेळ नसून मानसिक एकाग्रता, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठीही उपयुक्त आहे. ऑलिम्पिक दर्जाच्या या खेळामुळे तरुणांना व्यसनांपासून दूर राहण्याची प्रेरणा मिळते तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करण्याची संधी प्राप्त होते. त्यामुळे तायक्वांदो खेळाला प्रोत्साहन देणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन वर्धा शहराचे नगराध्यक्ष डॉ. सुधीर पांगुळ यांनी केले.
हुतात्मा स्मारक येथे तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन, वर्धा जिल्हा यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडित शंकर प्रसाद अग्निहोत्री होते. यावेळी मार्शल आर्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सल्लागार इमरान राही, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, लॉयन्स क्लब वर्धाचे अध्यक्ष निखिल रोकडे, कोषाध्यक्ष उल्हास वाघ, लीलाताई वाघ, अभिजित चौधरी, अभिजित रघुवंशी आणि साहिल वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.
समारंभात मान्यवरांच्या हस्ते समर्थ राजूरकर, कु. आर्या पाटील आणि प्रेम कवर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी खेळाडूंच्या यशाबद्दल अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल मानकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन नितीन यादव यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कैवल्य सागरकर, आर्यन छापेकर, मिहिर वाघ, रेखा वाघ, शीतल राजूरकर, क्रांती मोहिते, धनश्री माईंद, महीन तनू पांडे आणि वैष्णवी पांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.