बकऱ्या घरी आल्या, पण गुराखी नाही शोधात उघड झाला वाघाच्या हल्ल्यातील मृत्यू
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : नागभिड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मोटेगाव जंगल परिसरातील कक्ष क्रमांक ३८ मध्ये बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या एका गुराख्याचा पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. मृत गुराख्याची ओळख दिलीप जानबा नन्नावरे (वय ४५), रा. मोटेगाव अशी झाली आहे.
ते रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे बकऱ्या चारण्यासाठी मोटेगाव-पेंढरी मार्गावरील बद्री पहाडीखालील जंगल परिसरात गेले होते. सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
हल्ल्यानंतर वाघाने त्यांना ठार करून मृतदेह सुमारे ५०० मीटर अंतरापर्यंत ओढत नेल्याचे वनविभागाच्या तपासात समोर आले आहे.
घटनेचा उलगडा अत्यंत वेदनादायी परिस्थितीत झाला. नन्नावरे यांच्यासोबत असलेल्या बकऱ्या दुपारच्या सुमारास घरी परतल्या, मात्र ते स्वतः घरी आले नाहीत. यामुळे कुटुंबीयांना संशय आला. मुलाने वडिलांशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तो काही गावातील मुलांसह जंगलात शोध घेण्यासाठी गेला. शोधदरम्यान घटनास्थळी फाटलेले कपडे आणि कुऱ्हाड आढळून आल्याने अनर्थाची शक्यता निर्माण झाली.
ही माहिती गावात पोहोचताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने जंगल परिसरात धाव घेतली. परिसरात शोधमोहीम राबविल्यानंतर घटनास्थळापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर ननावरे यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर वनविभाग व पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सकाळी आठच्या सुमारास याच परिसरात रोपवाटिकेवर काम करणाऱ्या महिला मजुरांना तसेच काही नागरिकांना वाघ रस्ता ओलांडताना दिसला होता. त्यामुळे परिसरात वाघाची हालचाल सुरू असल्याचे संकेत आधीच मिळाले होते.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक महेश गायकवाड वनपरिक्षेत्र अधिकारी अनुप कन्नमवार यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांनीही पोलिस पथकासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागभिड उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दिलीप नन्नावरे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने या घटनेमुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या दिलीप नन्नावरे यांच्या कुटुंबीयांना वनविभागाकडून तातडीची ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. उर्वरित नुकसानभरपाईची रक्कम नियमानुसार लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली.
मोटेगाव व परिसरात मानवी जीविताला धोका निर्माण करणाऱ्या वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, जंगल परिसरात गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना