48 तासांत घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी अटकेत, 7.13 लाखांचे दागिने जप्त
48 तासांत घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी अटकेत, 7.13 लाखांचे दागिने जप्त
वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण
रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भवानी ज्वेलर्स येथे झालेल्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अवघ्या 48 तासांत यशस्वी उलगडा करत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून 7 लाख 13 हजार 950 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
ही माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय भगवान उदावंत (वय 41), रा. फत्तेपूर लेआऊट, वर्धा यांनी 26 मे 2026 रोजी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 25 मेच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी एमएचएडीए शॉपिंग कॉम्प्लेक्समधील भवानी ज्वेलर्सचे शटर तोडून दुकानात प्रवेश केला आणि सुमारे 9 किलो 360 ग्रॅम चांदीचे दागिने तसेच 16 ग्रॅम सोन्याची नथ चोरून नेली होती. चोरीस गेलेल्या मालाची अंदाजे किंमत 8 लाख 30 हजार रुपये होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची चार विशेष पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीचा माग काढला.
तपासात साहिल धीरज लांजेवार, अफरोज शमशाद अन्सारी आणि संघर्ष कैलास बागडे, सर्व रा. नागपूर अशी आरोपींची ओळख पटली. पोलिसांनी नागपुरात छापेमारी करून तिघांना अटक केली. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.
पोलिसांनी आरोपींकडून एकूण 7 लाख 13 हजार 950 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तसेच या टोळीतील इतर साथीदारांचा शोधही घेतला जात आहे.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांनी सांगितले की, गुन्ह्यांचा जलद उलगडा करण्यासाठी पोलीस विभाग तांत्रिक तपास आणि गुप्त माहिती यंत्रणेचा प्रभावी वापर करीत आहे. तर पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांनी तपासात सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले.