संत साहित्य मानवाला आदर्श जीवनाची दिशा देते : मोहन अग्रवाल
संत साहित्य मानवाला आदर्श जीवनाची दिशा देते : मोहन अग्रवाल
गोजी | प्रतिनिधी
गोजी येथील ग्रामपंचायत सभागृहात स्व. दत्ताजी मेघे रिसर्च फाउंडेशन, नागपूर आणि गुरुदेव सेवा मंडळ, गोजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सात दिवसीय ‘श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिरा’ अंतर्गत विद्यार्थ्यांना संत साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी संत गजानन महाराज देवस्थान ट्रस्ट, वर्धाचे अध्यक्ष मोहनबाबू अग्रवाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मोहनबाबू अग्रवाल म्हणाले की, संतांचे आचरण, त्यांचे विचार आणि संत साहित्याचा नियमित अभ्यास केल्याने माणसामध्ये संयम, सदाचार, संस्कृतीबद्दल आदर आणि मानवी मूल्यांची जपणूक करण्याची भावना निर्माण होते. संत साहित्य हे केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक नसून आदर्श, नैतिक आणि संवेदनशील जीवन जगण्याची प्रेरणा देणारे जीवनदर्शन असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक इमरान राही यांनीही मार्गदर्शन करताना संतांनी सत्य, अहिंसा, क्षमा, दया आणि परोपकार यांसारख्या शाश्वत मानवी मूल्यांची शिकवण दिल्याचे सांगितले. संत साहित्य लोभ, अहंकार आणि द्वेष यांसारख्या दुर्गुणांचा त्याग करून नैतिकता आणि मानवतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाला समाजसेवक राजू लभाणे, लायन्स शोतोकान कराटे-डो असोसिएशनचे अध्यक्ष कोशी उल्हास वाघ, शिबिराचे संयोजक नारायण आत्राम, समाजसेवक गोपाल वाघमारे, राजेश चिरडे, रामजी प्रभू शेलोटकर महाराज, योगिता वर्भे, युवा समाजसेवक अमोल मानकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण आत्राम यांनी केले, तर आभार प्रदर्शन गोपाल वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिबिरात सहभागी झालेल्या ६० विद्यार्थ्यांना संत साहित्याचे वितरण करण्या3त आले.