पडलेल्या गिट्टीमुळे दुचाकी घसरली,ट्रकखाली सापडून युवकाचा दुर्दैवी अंत

Sun 19-Jul-2026,11:55 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर : चंद्रपूर- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील घोडपेठ परिसरात रविवारी १९ जुलै रोजी दुपारचा सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावर पडलेल्या बारीक गिट्टीमुळे दुचाकी घसरून पडल्याने दुर्घटना झाली.

मृतकाची ओळख अनिल सुधाकर बावणे रा. शिवाजीनगर, भद्रावती अशी झाली आहे. ते अँक्टिवा एमएच ३४ सीएस ७८७५ या दुचाकीवरून भद्रावतीहून चंद्रपूरकडे आपल्या ड्युटीसाठी जात होते. घोडपेठ परिसरात महामार्गावर पडलेल्या बारीक गिट्टीवरून दुचाकी घसरल्याने त्यांचा वाहनावरील ताबा सुटला. त्याचवेळी मागून भरधाव येणाऱ्या ट्रक क्रं. आरजे १७ सीबी ३५१९ ने त्यांना चिरडल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघातावेळी अनिल बावणे यांनी हेल्मेट परिधान केले होते. मात्र अपघात इतका भीषण होता की हेल्मेटचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. त्यामुळे सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेतली असतानाही त्यांचा जीव वाचू शकला नाही.

घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. अपघातामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

प्राप्त माहितीनुसार रस्त्यावर पडलेली बारीक गिट्टी हीच दुर्घटनेचे प्रमुख कारण असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील तपास ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती पोलीस करीत आहेत.

या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर पडलेली बारीक गिट्टी आणि रस्त्याच्या देखभालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा प्रकारे रस्त्यावर साचलेली गिट्टी दुचाकीस्वारांसाठी मोठा धोका ठरत असल्याने संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.