कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड विरोधात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात दिली लेखी तक्रार

प्रतिनिधी मोहम्मद नासीर चंद्रपूर
कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा पत्रकार परिषदेत इशारा
बल्लारपूर :शेतकऱ्यांना रासायनिक खत देताना जबरदस्तीने इतर उत्पादने खरेदीस भाग पाडणाऱ्या कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनी विरोधात आज, शनिवार, ५ जुलै २०२५ रोजी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून, या प्रकरणी तातडीने कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिले.शेतकऱ्यांना खताचा पुरवठा करण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकारी यांनी खताचे वाटप आणि वितरण कसे करावे, याबाबत कोरोमंडल कंपनीला स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. त्यानंतरही कोरोमंडल शेतकऱ्यांना अनावश्यक उत्पादने घेण्यास जबरदस्ती करीत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोमंडल कंपनीला दोन नोटीस दिल्या. लिंकींगचा हट्ट धरू नये, असे सुचवले. त्यानंतर ही कंपनी शेतकऱ्यांना डीएपीची खरेदी करताना सल्फर, पीडीएम पोटॅश आणि १५:१५:१५ खते जबरदस्तीने घ्यायला लावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याचे आ. मुनगंटीवार म्हणाले.ते पुढे म्हणाले, या संदर्भात कृषी विभागाचे सचिव विकास रस्तोगी यांची वैयक्तिकरित्या भेट घेतली आणि चंद्रपूर जिल्ह्यात अशा प्रकारचे शेतकऱ्यांविरोधातील अन्यायकारक प्रकार होऊ नयेत, याबाबत त्यांचे लक्ष वेधले. जगाच्या पोशिंद्यांवर असा अन्याय होतो आहे, हे त्यांच्यासमोर स्पष्टपणे मांडले. तसेच, कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे विक्री व विपणन उपप्रबंधक प्रितम सिंह यांच्याशीही संवाद साधला. त्यांना विनंती केली की, शेतकऱ्यांवर जबरदस्ती थोपवू नका आणि झालेल्या चुका तात्काळ दुरुस्त करा.कोरोमंडल लिमिटेड आणि कंपनीचे विक्री व विपणन जीवनावश्यक वस्तू प्रतिबंधक अधिनियमांतर्गत योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशीही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मागणी केली आहे. शेतकऱ्यांचे शोषण थांबले नाही, तर यापुढे आंदोलनात्मक मार्गही अवलंबण्यात येईल, असा इशाराही आ. मुनगंटीवार यांनी यावेळी दिला.कायदेशीर लढा उभारण्याचा निर्णय -शेतकऱ्यांना रासायनिक खत पुरवठा करताना जबरदस्तीने इतर वस्तू विकत घेण्यास भाग पाडणाऱ्या खत पुरवठाधारकांविरोधात कायदेशीर लढा उभारण्याचा निर्णय आ. मुनगंटीवार यांनी घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून आज तक्रार दाखल करण्यात आली. शेतीसाठी अत्यावश्यक असलेले रासायनिक खत कोरोमंडलसारख्या नामांकित कंपन्यांकडून वितरित केले जाते.उपप्रबंधक प्रितम सिंह यांच्या विरुद्ध तक्रार देताना भाजपचे स्थानिक नेते, कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.