पोलीस स्टेशन हिंगणघाटचे पथकाचे यश,गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीवर कारवाई
 
                                    
                                अब्दुल कदीर बख्श
वर्धा:हिंगणघाट (दि. 10 जुलै 2025) – दारुबंदी कायद्यान्वये कठोर कारवाई करत हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या पथकाने गावठी मोहा दारूची वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला रंगेहाथ पकडले. पोलीसांनी त्याच्याकडून 20 लिटर गावठी दारू आणि वाहनासह एकूण 22,020 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली होती की, विजय शरद राऊत (वय 26 वर्षे, रा. खैराटी पारधी बेडा, ता. हिंगणघाट) हा गावठी मोहा दारूची मोटरसायकलवरून वाहतूक करत खैराटी पारधी बेडा येथून हिंगणघाट शहरात येत आहे.ही माहिती मिळताच पोलीस स्टेशन हिंगणघाटचे पोलीस हवालदार प्रविन बोधाने, स्वप्नील जिवणे, पोलीस अंमलदार प्रमोद डडमल आणि सागर सामृतवार यांच्या पथकाने नाकेबंदी केली आणि आरोपीस थांबवून तपासणी केली. तपासणी दरम्यान, आरोपीच्या ताब्यातील हीरो होंडा अँबिशन (क्र. MH 32 H 1141) या दुचाकीवर **दोन प्लास्टिकच्या थैलींमध्ये एकूण 20 लिटर गावठी मोहा दारू सापडली.दारूची किंमत प्रती लिटर 100 रुपये प्रमाणे एकूण 2000 रुपये एवढी असून, मोटरसायकलची किंमत 20,000 रुपये व थैलींची किंमत 20 रुपये असा एकूण 22,020 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर कारवाई घटनास्थळी पंचासमक्ष जप्ती पंचनामा करून करण्यात आली असून, आरोपी विजय राऊत याच्यावर दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या सूचनेनुसार पार पडली.
 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
                     
                                                                 
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                            