कोल वॉश नंतरचा चांगला कोळसा रिजेक्ट म्हणून विकला जातोय आमदार किशोर जोरगेवारांचा विधानसभेत गंभीर आरोप

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
१३ हजार कोटींच्या भ्रष्टाचाराची शक्यता; सखोल चौकशीची मागणी
चंद्रपूर : महाजेनकोच्या कोल वॉशरीजमधून तयार होणारा उच्च दर्जाचा कोळसा मुद्दामहून रिजेक्ट कोल म्हणून दर्शवून खुल्या बाजारात कमी दराने विकला जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. या प्रकारामुळे राज्याच्या तिजोरीला तब्बल १३ हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याचा दावा करत त्यांनी या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणी केली.वेकोलि, एमसीएल, एसईसीएल, एमईसीएल आणि एससीसीएल या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या खाणींमधून दरवर्षी सुमारे १३ कोटी ७८ लाख टन कोळसा मिळवला जातो.यातील कोळशाची गुणवत्ता वाढवण्यासाठी महाजेनकोने खासगी वॉशरीजना कोळसा धुण्याचे कंत्राट दिले आहे. त्यानंतर तयार होणाऱ्या गुणवत्ताधारित कोळशाची वाहतूक महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाकडे सोपवण्यात आली आहे.आमदार जोरगेवार यांनी सभागृहात मांडले की, वॉशरीजकडून तयार होणारा चांगला कोळसा रिजेक्ट कोल म्हणून जाणीवपूर्वक नोंदवला जातो आणि खुल्या बाजारात विक्रीसाठी वापरला जातो. सरासरी ५ हजार रुपये प्रति टन या दराने सुमारे २ कोटी ७५ लाख ७६ हजार टन कोळसा खासगी कंपन्यांना विकण्यात आल्याचे उघड झाले असून, त्यातून १३ हजार कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप त्यांनी केला.हा महाराष्ट्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा कोळसा घोटाळा असून, राज्य सरकारने याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी औचित्याच्या मुद्द्यावर भाष्य करताना केली. यासोबतच, भविष्यात असे गैरव्यवहार टाळण्यासाठी कोल वॉशरीज थेट विद्युत प्रकल्पांच्या परिसरातच स्थापन करण्याचे धोरण राबवावे, अशी सूचनाही आमदार जोरगेवार यांनी केली. राज्य सरकारकडून यावर काय पावले उचलली जातात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे