बल्लारपूरमध्ये मोकाट जनावरांचा हैदोस,नागरिक त्रस्त, प्रशासन निष्क्रिय

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर:बल्लारपूर २१ जुलै बल्लारपूर शहरात मोकाट जनावरांमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले असून,अपघातांची शक्यता वाढली आहे. नगरपालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरात अराजकसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप आम आदमी पार्टी बल्लारपूरचे शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी केला आहे. याबाबत मुख्याधिकारी, नगरपालिका,बल्लारपूर यांना एक आक्रमक निवेदन सादर केले आहे. पुप्पलवार यांनी नुकताच महामार्गावर मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या त्रासाचा एक व्हिडिओ फेसबुकवर टाकला होता, ज्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरातील रस्त्यांवर आणि महामार्गांवर अचानक समोर येणाऱ्या जनावरांमुळे वाहनचालक, विशेषतः शाळकरी विद्यार्थी आणि दुचाकीस्वार गंभीर अपघातांना बळी पडत आहेत. बल्लारपूरला बायपास नसल्यामुळे जड वाहने शहरातूनच जातात आणि ही जनावरे रस्त्यांवर, चौकात तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठाण मांडून बसतात. यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या जनावरांमुळे सार्वजनिक ठिकाणी घाण करतात व कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे नागरिकांच्या झोपेचा भंग होत आहे, आणि नागरिकांवर हल्ले होत असल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मोकाट जनावरे पकडण्यासाठी निविदा काढूनही शहरात अशी भीषण अवस्था का निर्माण झाली आहे,याचा जाब आम आदमी पार्टीने विचारला आहे. संबंधित अधिकारी या गंभीर समस्येकडे का दुर्लक्ष करत आहेत, याबाबत तात्काळ आणि लेखी स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली आहे. या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, जनावरांच्या मालकांना कठोरपणे जागरूक करावे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोरतम कारवाई करावी व निवेदनाच्या शेवटी, शहराध्यक्ष रवि पुप्पलवार यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे: "जर पाच दिवसांत ही समस्या दूर झाली नाही, तर त्यानंतर मोकाट जनावरांना पकडून नगरपालिकेत सोडण्यास आम्ही भाग पडू आणि त्याची संपूर्ण जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची असेल."याचे एक प्रत जिल्हाधिकारी, चंद्रपूर आणि पोलीस निरीक्षक, बल्लारपूर यांनाही माहितीसाठी सादर करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी तातडीने नगरपरिषदेशी संपर्क साधून या समस्येवर उपाययोजना करावी अशी विनंतीही या पत्रात करण्यात आली आहे.बल्लारपूरच्या नागरिकांना या समस्येतून दिलासा कधी मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.निवेदन देताना शहर अध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, उपाध्यक्ष अफज़ल अली, शहर प्रवक्ता आसिफ शेख, शिक्षण आघाड़ी अध्यक्ष अजयपाल सूर्यवंशी, यूथ उपाध्यक्ष स्नेहा गौर, सम्यक गायकवाड, हर्षद खांडागडे, आदित्य भागवत इत्यादि उपस्थित होते.