आमदार रामदास मसराम यांच्या स्थानिक विकास निधीतून देसाईगंज शहरात विकास कामांचे भूमिपूजन

Tue 30-Dec-2025,07:42 PM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली 

आरमोरी दि. 29 डिसेंबर : शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आमदार रामदास मसराम यांच्या स्थानिक विकास निधीतून देसाईगंज शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. देसाईगंज येथील हनुमान वार्डातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंदिर परिसरात गट्टू बांधकाम तसेच हनुमान वार्डात सी.सी. रोड बांधकाम या कामांचा शुभारंभ आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते पार पडला.

या कामांमुळे मंदिर परिसराचा कायापालट होणार असून नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व सुकर वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे. पावसाळ्यात परिसरात साचणारे पाणी व चिखलाची समस्या दूर होऊन भाविकांसह स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हनुमान वार्डातील सी.सी. रोडमुळे दळणवळण अधिक गतिमान होणार असून परिसरातील रहिवाशांना दैनंदिन वापरासाठी सोयीचा रस्ता उपलब्ध होणार आहे.

भूमिपूजन प्रसंगी आमदार रामदास मसराम यांनी सांगितले की, “देसाईगंज शहरातील प्रत्येक प्रभागाचा समतोल व दर्जेदार विकास हाच माझा ध्यास आहे. नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन स्थानिक विकास निधीतून आवश्यक ती सर्व विकास कामे मंजूर करण्यात येत आहेत. भविष्यातही देसाईगंजच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.”

या कार्यक्रमास आमदार रामदास मासराम,नगराध्यक्ष शालू दंडवते, नगरसेवक. विकास प्रधान, नगरसेवक.श्याम उईके, कांग्रेस नेते वनिता नाकतोडे, नगरसेवक राधिका पत्रे, नगरसेवक. गुरमीतकौर चावला, नगरसेवक. आश्या दहिवले, नगरसेवक फैमिदा पठाण, नगरसेवक मंदा समर्थ उपस्थित होते तसेच सर्व तुकडोजी महाराज मंदिराचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष,सचिव,सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी आमदार रामदास मसराम यांच्या माध्यमातून होत असलेल्या विकास कामांचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.

या विकास कामांमुळे हनुमान वार्डासह देसाईगंज शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.