पुलगाव–शिरपूर २५ किमी रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी; आंदोलनाचा इशारा
तालुका प्रतिनिधी इरशाद शाह वर्धा
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील पुलगाव ते शिरपूर या सुमारे २५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी ‘युवा परिवर्तन की आवाज’ सामाजिक संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग, वर्धा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पुलगाव–विजयगोपाल मार्गे शिरपूर हा महत्त्वाचा रस्ता गेल्या १५ ते २० वर्षांपासून नव्याने बांधण्यात आलेला नाही. मागील पाच वर्षांपासून रस्त्याची स्थिती अधिकच बिकट झाली असून, वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
संघटनेच्या वतीने यापूर्वी २०२१ आणि २०२२ मध्ये दोन वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन देऊन सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र निधीअभावी अद्यापही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
येणाऱ्या १५ दिवसांत रस्त्याच्या दुरुस्तीबाबत किंवा निधी उपलब्धतेबाबत लेखी उत्तर न दिल्यास ‘भीक मागो आंदोलन’ करण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनातून जमा होणारी रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाला देऊन, त्या रकमेतून शक्य तेवढे रस्त्याचे काम करून घ्यावे, अशी उपरोधिक मागणी करण्यात आली आहे.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे, जिल्हाध्यक्ष विशाल इचपाडे, तसेच ऋषिकेश इंगोले, शुभांशू लोखंडे, हेमंत भोसले, शेखर इंगोले, इर्शाद शहा, अमन नारायण, दिनेश परचाके, मुन्ना खडसे, मनोज आणि प्रशांत यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुलगाव–शिरपूर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, आता प्रशासन या मागणीची दखल घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.