टेकडी परिसरात पोलिस चौकीची मागणी,आमदार मुनगंटीवार यांना निवेदन
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.
बल्लारपूर : बल्लारपूर शहरातील टेकडी परिसरात पोलिस चौकी स्थापन करण्याची मागणी भाजप कामगार मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव अजय दुबे यांनी केली असून, याबाबत बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बल्लारपूर हे सुमारे एक लाख लोकसंख्येचे औद्योगिक शहर असून, इतर शहरांच्या तुलनेत येथे विविध प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. सध्या बल्लारशाह पोलिस ठाण्यांतर्गत बस्ती विभाग, रेल्वे चौक व पेपरमिल गेट परिसरात अशा केवळ तीन पोलिस चौक्या कार्यरत आहेत.
मात्र आलापल्ली राज्य महामार्गाच्या पलीकडे वसलेल्या मोठ्या लोकवस्तीच्या टेकडी परिसरात एकही पोलिस चौकी नाही.
टेकडी परिसरात अवैध दारू विक्री, गोवंश हत्या, बेकायदेशीर कत्तलखाने, गांजा व्यापार यासारख्या गैरकृत्यांची माहिती मिळत असून, मारहाण व गुंडगर्दीच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे या भागात पोलिस चौकी स्थापन झाल्यास नियमित गस्त, तात्काळ मदत, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना आणि गुन्हेगारांवर वचक बसण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर टेकडी परिसरात पोलिस चौकी स्थापनेसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलिस अधीक्षक, तहसीलदार बल्लारपूर व नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासह संयुक्त बैठक आयोजित करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती अजय दुबे यांनी आमदार मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.