कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञांचे बेमुदत उपोषण

Wed 21-Jan-2026,09:57 AM IST -07:00
Beach Activities

सेवाग्राम (वर्धा) | प्रतिनिधी : युसूफ पठाण

दि. २१ जानेवारी २०२६ महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था (MGIMS) व कस्तुरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्राम येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी बुधवार, दि. २१ जानेवारी २०२६ पासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.

गेल्या तीन वर्षांहून अधिक काळापासून हे कर्मचारी संस्थेच्या विविध प्रयोगशाळांमध्ये जबाबदारीने सेवा बजावत असतानाही त्यांना अद्याप नियमित कर्मचारी म्हणून मान्यता देण्यात आलेली नाही. तसेच जाहिरातीत नमूद असलेले योग्य पदनाम व वेतनमान लागू करण्यात आले नसल्याचा गंभीर आरोप आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला आहे.

आंदोलनामागील प्रमुख कारणे

जाहिरातीत नमूद असलेल्या ‘प्रयोगशाळा तंत्रज्ञ’ या पदाऐवजी कर्मचाऱ्यांची ‘प्रयोगशाळा तंत्रज्ञ (कनिष्ठ)’ म्हणून नियुक्ती करण्यात आली.

जाहिरातीनुसार निश्चित केलेले वेतनमान व सेवा लाभ अद्याप लागू करण्यात आलेले नाहीत.

तीन वर्षे २१ दिवसांचा प्रोबेशन कालावधी यशस्वीरित्या पूर्ण करूनही कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण करण्यात आलेले नाही.

दीर्घकाळ सेवा देऊनही सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या

जाहिरातीनुसार प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदावर तात्काळ नियमितीकरण करण्यात यावे.

पूर्ण झालेल्या प्रोबेशन कालावधीचा विचार करून सेवेत कायम करण्यात यावे.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदानुसार योग्य वेतन श्रेणी व सर्व सेवा लाभ त्वरित लागू करण्यात यावेत.

उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांनी “अन्याय थांबवा, कर्मचाऱ्यांना न्याय द्या” अशी जोरदार मागणी केली.

कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, “वेतन, हक्क आणि सेवा सुरक्षा हे आमचे मूलभूत हक्क आहेत. प्रशासनाने आमच्यावर होणारी दडपशाही थांबवून न्याय द्यावा.”

प्रयोगशाळा सेवांवर परिणाम होण्याची शक्यता

या बेमुदत उपोषणामुळे संस्थेच्या प्रयोगशाळा सेवांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, याबाबत कस्तुरबा हेल्थ सोसायटी प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की, संस्थेचे प्रशासन यापूर्वीही विविध कर्मचाऱ्यांच्या आंदोलनांकडे दुर्लक्ष करत आले आहे. तसेच डॉ. अजयकुमार शुक्ला (अधिष्ठाता, MGIMS) व डॉ. बी. एस. गर्ग (सचिव, कस्तुरबा हेल्थ सोसायटी) यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

आजपासून सुरू झालेल्या या बेमुदत उपोषणावर वेळीच तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य कराव्यात व संस्थेतील कामकाज सुरळीत ठेवावे, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.