हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते भूमिपूजन; ६ कोटी २८ लाखांची सुसज्ज वास्तू उभारली जाणार
अब्दुल कदीर बख्श मुख्य संपादक
हिंगणघाट : हिंगणघाट येथे पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडले. या कार्यक्रमाला आमदार समीर कुणावार, नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर, जिल्हाधिकारी वान्मथी सी., पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, बाजार समिती सभापती ॲड. सुधीर कोठारी, किशोर दिघे, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले की, गेल्या ११ वर्षांत पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनने राज्यभर उल्लेखनीय कामगिरी केली असून, त्यात आता हिंगणघाटचाही समावेश झाला आहे. नवीन इमारतीमुळे पोलिसांना सुसज्ज व सुरक्षित कार्यपरिसर मिळेल, तसेच नागरिकांना जलद व प्रभावी न्याय मिळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार समीर कुणावार यांनी सन २०१४ पासून या इमारतीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगून, शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता हिंगणघाटमध्ये दुसऱ्या पोलीस स्टेशनची आवश्यकता असल्याचे मत मांडले. तसेच लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस बळ वाढवण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांनी नवीन इमारतीत महिला पोलिसांसाठी तसेच महिला तक्रारदारांसाठी विशेष सोयीसुविधा असाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करत नगरपरिषदेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.
प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी या इमारतीसाठी ६ कोटी २८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली. हिंगणघाट हे औद्योगिक व वेगाने विस्तारत असलेले शहर असल्याने, वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही इमारत पोलिसांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन पोलीस कर्मचारी स्मिता महाजन यांनी केले, तर ठाणेदार अनिल राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.