कर थकबाकीदारांवर नगर परिषदेचा कडक बडगा,आठवडी बाजारातील गाळे सिल
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.
बल्लारपूर* : नगर परिषदेकडून थकीत कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, कर न भरलेल्या दुकान गाळेधारकांवर कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या अंतर्गत आठवडी बाजारातील काही दुकान गाळे सिल करण्यात आल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.
सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठी चालू व थकीत मालमत्ता कर तसेच दुकान गाळे भाडे वसुलीसाठी नगर परिषदेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी स्वतंत्र जप्ती पथक स्थापन करण्यात आले असून, थकबाकीदारांविरुद्ध जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत शुक्रवारी ३ एप्रिल रोजी आठवडी बाजारातील दुकान गाळा क्रमांक ०४, ०५, १४ व २८ यांना सिल लावण्यात आले.
मात्र, कारवाईदरम्यान गाळा क्रमांक ०४ व ०५ धारकांनी तत्काळ थकीत भाडे भरून गाळे मुक्त करून घेतल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
ही कारवाई मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या नेतृत्वात उपमुख्याधिकारी रविंद्र भंडारवार, उपमुख्याधिकारी तथा कर अधिकारी कु. संगिता उमरे, कार्यालय अधीक्षक नंदकिशोर सातपुते, रोहीत निकेसर, विजेंद्र सौदागर, रशिद खान पठान, शंकर रामटेके, मारोती चापले, अशोक कोडापे यांच्या उपस्थितीत पार पडली.
दरम्यान, येत्या तीन ते चार दिवसांत उर्वरित थकीत गाळेधारकांवरही अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. थकबाकीदारांनी तातडीने कर व भाडे भरावे, अन्यथा गाळे सिल करण्याची कारवाई करण्यात येईल, असे आवाहन मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी केले आहे