नैपुण्य मिळविण्यासाठी तांत्रिक बारकावे आत्मसात करा : इमरान राही
नैपुण्य मिळविण्यासाठी तांत्रिक बारकावे आत्मसात करा : इमरान राही
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
वर्धा : वर्धा कोणत्याही क्रीडा प्रकारात नैपुण्य मिळविण्यासाठी त्या खेळातील तांत्रिक बारकावे समजून घेणे आणि सातत्यपूर्ण सराव करणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षणासोबतच खेळातील प्राविण्य विद्यार्थ्यांच्या प्रगतीची नवी दारे उघडू शकते, असे प्रतिपादन ‘युनिव्हर्सल मार्शल आर्ट अकॅडमी’चे राष्ट्रीय सल्लागार इमरान राही यांनी केले.
सेवाग्राम येथील हुतात्मा स्मारक परिसरात तायक्वांदो स्पोर्ट असोसिएशन, वर्धा जिल्हा आणि लॉयन्स ट्रेडिशनल शोतोकान कराटे डो असोसिएशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कलर बेल्ट, प्रमाणपत्र व मेडल वितरण सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लॉयन्स ट्रेडिशनल शोतोकान कराटे डो असोसिएशन (इंडिया) चे संचालक कोशी उल्हास वाघ होते. यावेळी आनंद निकेतन सेवाग्रामच्या मुख्याध्यापिका जया गावंडे, सेवाग्रामच्या माजी सरपंच सुजाता ताकसांडे, तायक्वांदो स्पोर्ट असोसिएशन वर्धा जिल्हाचे अध्यक्ष अमोल मानकर, पालक प्रतिनिधी महेंद्र टेंभरे, संघटनेचे सचिव सेंसाई साहिल वाघ, लाठी असोसिएशन वर्धा जिल्हाच्या राज्य पंच प्रांजली मानकर तसेच आयरन स्पिरिट स्पोर्ट अकॅडेमीचे प्रशिक्षक गौरव तामगाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत खेळाडूंना कलर बेल्ट, प्रमाणपत्र व मेडल प्रदान करून गौरविण्यात आले. यामध्ये संस्कृती टेंभरे, साक्षी बोरले, श्लोक शिंगणापूरे, विश्वजित सोनवणे, रचित कांबळे, वेद भडके आणि मृणाल टेंभरे यांना यलो बेल्ट व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच लुहान गोडघाटे याने गोल्ड मेडल, पूर्वी दोडके व अधिरा हांडे यांनी ब्राँझ मेडल, तर श्रावस्ती मानकर हिने सिल्वर मेडल पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.
कार्यक्रमाचे आयोजन तायक्वांदो स्पोर्ट असोसिएशन, वर्धा जिल्हाचे अध्यक्ष अमोल मानकर यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना गौरव तामगाडगे यांनी केली. सूत्रसंचालन प्रांजली मानकर यांनी तर आभार प्रदर्शन अरीत मानकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देशमुख सर, राहुल शिंगणापूरे, बोरले ताई, कांबळे ताई तसेच पालकांचे विशेष सहकार्य लाभले. शेवटी निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी सर्व खेळाडू व आयोजकांचे अभिनंदन केले