बल्लारपूर पोलीस ठाण्यात बदली झालेल्या अधिकाऱ्यांचा सन्मानपूर्वक निरोप समारंभ

Thu 04-Jun-2026,09:02 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.

बल्लारपूर : बल्लारपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्रीनाथ गिरम आणि पोलीस हवालदार संतोष दंडेवार यांच्या बदलीनिमित्त पोलीस ठाणे परिसरात सन्मानपूर्वक निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करून भावी सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात पोलीस निरीक्षक बिपिन इंगले यांनी श्रीनाथ गिरम व संतोष दंडेवार यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या सेवाकाळात कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पण भावनेने काम करत पोलीस विभागाची प्रतिष्ठा वाढविल्याचे सांगितले.

उपनिरीक्षक श्रीनाथ गिरम हे मागील सुमारे एक वर्षापासून बल्लारपूर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांची बदली छत्रपती संभाजीनगर येथे झाली आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी नियंत्रण आणि जनतेशी सुसंवाद प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. तर पोलीस हवालदार संतोष दंडेवार यांची बदली चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात झाली असून, त्यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात अनेक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या शांत, मनमिळावू आणि सहकार्यशील स्वभावामुळे ते सहकारी तसेच नागरिकांमध्ये लोकप्रिय होते.

निरोप समारंभात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांसोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या योगदानाचा गौरव केला. यावेळी वातावरण भावनिक आणि आत्मीयतेने भरून गेले होते.

या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, मदन दिवटे, पोलीस उपनिरीक्षक प्रेमशाह सयाम, विक्की लोखंडे, सलीम शेख, उमेश जोगदंड, वैभव चौहान, करिश्मा मोरे, मनोहर मडावी सफौ गजानन डोईफोडे यांच्यासह गुन्हे शाखा, वाहतूक नियंत्रण शाखा, गुप्तवार्ता विभाग सह बल्लारपूर पोलीस ठाण्याचा संपूर्ण कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

समारोपप्रसंगी सर्व उपस्थितांनी पोलीस उपनिरीक्षक श्रीनाथ गिरम आणि पोलीस हवालदार संतोष दंडेवार यांना त्यांच्या नवीन नियुक्तीस्थळी यशस्वी, निरोगी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. हा निरोप समारंभ पोलीस विभागातील परस्पर आदर, जिव्हाळा आणि सहकार्याच्या भावनेचे प्रतीक ठरला.