ठेवी परताव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह,निर्मल उज्ज्वल सोसायटी विरोधात खातेदारांची पोलिसांत धाव

Wed 12-Aug-2026,11:47 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर: निर्मल उज्ज्वल को-ऑपरेटिव्ह सोसायटी मल्टीस्टेट, नागपूरच्या बल्लारपूर शाखेतील खातेदारांना मागील तीन ते चार महिन्यांपासून त्यांच्या खात्यातील रक्कम मिळण्यात अडचणी येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वारंवार शाखेत जाऊनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्त झालेल्या खातेदारांनी अखेर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

संस्थेच्या संबंधित पदाधिकाऱ्यांसह बल्लारपूर शाखेच्या व्यवस्थापकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आल्याची माहिती आहे. या वेळी मोठ्या संख्येने खातेदार व नागरिक पोलिस ठाण्यात उपस्थित होते.खातेदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी कष्टाने जमा केलेली बचत या संस्थेत ठेवली आहे.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून स्वतःच्या खात्यातील पैसे काढताना अडचणी निर्माण होत आहेत. रक्कम मिळण्यासाठी शाखेत वारंवार चकरा मारूनही वेगवेगळी कारणे सांगितली जात असल्याचा आरोप खातेदारांनी केला.

ज्येष्ठ नागरिक, महिला आर्थिक अडचणीत - 

ठेवीची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सर्वसामान्य बचतदार आर्थिक अडचणीत सापडल्याचे खातेदारांनी सांगितले. आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी अनेकदा शाखेत जाऊनही तोडगा न निघाल्याने खातेदारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर खातेदारांनी एकत्र येत संस्थेच्या संबंधित पदाधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच खातेदारांच्या ठेवी सुरक्षित असून त्या तातडीने परत मिळाव्यात, अशी मागणीही करण्यात आली.

शेकडो खातेदारांचे पैसे अडकले - 

प्रकरणामुळे बल्लारपूर शहरात चर्चेला उधाण आले असून, मोठ्या संख्येने खातेदारांनी एकत्र येत आपल्या ठेवी परत मिळवून देण्याची मागणी केली आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून खातेदारांचे आर्थिक हित सुरक्षित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.दरम्यान, पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणात कोणती कायदेशीर कारवाई केली जाते, याकडे खातेदारांचे लक्ष लागले आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका तसेच पोलिस तपासातून नेमके काय निष्पन्न होते, यानंतरच या प्रकरणाचे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.