अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; ६.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

Thu 01-Oct-2026,09:59 PM IST -07:00
Beach Activities

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; ६.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

वर्धा : दहेगाव गोसावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरीत्या चोरीची काळी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एकाला ताब्यात घेण्यात आले असून, ट्रॅक्टर, ट्रॉलीसह अंदाजे एक ब्रास काळी वाळू असा एकूण ६ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

१ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दहेगाव गोसावी पोलीस ठाण्याचे ठाणेदार यशवंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक अवैध वाळू वाहतुकीविरोधात गस्तीवर होते. यावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हमदापूर येथील देरडा चौकात नाकाबंदी करण्यात आली.

यावेळी लाल रंगाच्या ट्रॅक्टरमधून हिरव्या रंगाच्या ट्रॉलीत काळी वाळू भरून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. ट्रॅक्टर चालक शाम भारगुजी नैताम, रा. देऊळगाव (शिवनगर), हा पोलिसांना पाहून घटनास्थळावरून पसार झाला. तर ट्रॅक्टर मालक समीर विलास वैद्य (२५), रा. देऊळगाव (शिवनगर), ता. सेलू, जि. वर्धा याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

कारवाईत मॅसी फर्ग्युसन कंपनीचा ट्रॅक्टर (क्र. एमएच ३२ एएक्स ३३६३) किंमत ५ लाख रुपये, राज कंपनीची ट्रॉली (क्र. एमएच ३२/पी २४१०) किंमत १ लाख ५० हजार रुपये आणि अंदाजे एक ब्रास काळी वाळू किंमत १० हजार रुपये, असा एकूण ६ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी शासनाच्या तक्रारीवरून गुन्हा क्र. १८८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३(५) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार कलम ३(१), १८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार यशवंत कदम यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात सहायक फौजदार ब्रह्मानंद मुन, पोलीस हवालदार आनंद भस्मे, राधाकिसन घुगे तसेच पोलीस अंमलदार कांचन चाफले, अनिल चिलगर आणि संदेश सोयाम यांनी केली.