अखेर वसमत नगरपरिषदेसमोरील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

Tue 10-Nov-2026,08:00 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली : वसमत नगरपरिषद कार्यालयासमोर आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेले कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अखेर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. नगराध्यक्ष सुनीता मनमोहन बाहेती यांच्यासह नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी हा निर्णय घेतला.

गेल्या काही दिवसांपासून कंत्राटी कर्मचारी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन करीत होते. या आंदोलनामुळे नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधले गेले होते. अखेर या प्रकरणात नगराध्यक्ष सुनीता मनमोहन बाहेती, उपनगराध्यक्ष राजकुमार दादा एंगडे, गटनेते सचिन दगडू, नगरसेवक प्रतिनिधी गौतम वावळे तसेच नगराध्यक्ष प्रतिनिधी कन्हैया बाहेती यांनी मध्यस्थी करत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.

यावेळी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

मात्र, हे आंदोलन कायमस्वरूपी मागे घेण्यात आलेले नसून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कधी होणार, याकडे आता कंत्राटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने दिलेला शब्द पाळून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.