हावडा-कुर्ला एक्सप्रेसमधून 3.48 लाखांचा गांजा जप्त; वर्धा रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई
हावडा-कुर्ला एक्सप्रेसमधून 3.48 लाखांचा गांजा जप्त; वर्धा रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई
वर्धा प्रतिनिधी : युसूफ पठाण
वर्धा : रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा अंतर्गत हावडा-कुर्ला एक्सप्रेसमध्ये अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. गाडी क्रमांक 18030 हावडा-कुर्ला एक्सप्रेसमधील लावारिस बॅगमधून एकूण 12 किलो 574 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत अंदाजे 3,48,260 रुपये आहे.
घटनेचा तपशील :
दि. 9 एप्रिल 2026 रोजी लोहमार्ग पोलीस नियंत्रण कक्ष, नागपूर येथून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, हावडा-कुर्ला एक्सप्रेसच्या कोच क्रमांक A-1 मधील बर्थ क्रमांक 43 व 45 खाली दोन संशयास्पद लावारिस बॅग असल्याची माहिती मिळाली. गाडी वर्धा स्थानकावर येताच रेल्वे पोलिसांनी तत्काळ सघन तपासणी मोहीम राबवली.
कारवाईतील मुद्दे :
NDPS कायद्यानुसार कारवाई करत वर्धा तहसीलचे नायब तहसीलदार अजय धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. तपासणीदरम्यान दोन ट्रॉली बॅग जप्त करण्यात आल्या.
पहिली बॅग : ‘Apex’ कंपनीची ग्रे-सिल्वर रंगाची बॅग असून त्यामध्ये 10 बंडलमध्ये एकूण 10 किलो 510 ग्रॅम गांजा आढळला. (अंदाजे किंमत : 1,56,900 रुपये)
दुसरी बॅग : ‘7 Years’ असे लिहिलेली डार्क ग्रीन रंगाची बॅग असून त्यामध्ये ब्राऊन सेलोटेपने बांधलेले 12 बंडल आढळले.
दोन्ही बॅगमधील गांजा व बॅग यांची एकत्रित किंमत 3,48,260 रुपये इतकी आहे. याप्रकरणी रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथे अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक 69/2026, कलम 8(क), 20(ब), (क) NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मार्गदर्शनाखाली कारवाई :
ही कारवाई लोहमार्ग नागपूरचे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड आणि अनुविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत सहभागी अधिकारी :
सहायक पोलीस निरीक्षक पंकज ढोके, पोलीस उपनिरीक्षक अंगद कोतवाड, नितीन कुमार जाधव, एएसआय प्रमोद घ्यारे, हवालदार अशोक हनुवंते, खंडारे, धुर्वे तसेच पोलीस सिपाही कारमेघे, घंगाळ आणि भावे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
सध्या रेल्वे पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.